- रेश्मा राणे.
दिल्ली येथे एका अभागी भगिनीवर झालेल्या सामुहिक अत्याचाराने सारा देश खडबडून जागा झाला आणि स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दिल्लीतील त्या मुलीवर जो प्रसंग ओढवला तो माणुसकीला काळिमा फासणारा आहे. माणसाची नैतिकता किती खालावलेली आहे हेच या घटनेवरून दिसून येते. ती मुलगी रात्री १० च्या सुमारास आपल्या मित्राबरोबर एका खाजगी बसमधून प्रवास करत असताना तिच्यावर पाच जणांच्या टोळक्याने सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला प्रचंड शारीरिक यातना देवून तिच्या मित्रासह बसमधून फेकून दिले. अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. मिडीयाने या घटनेला
भरपूर प्रसिद्धी दिल्यानंतर अनेक तरुण-तरुणी रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करू लागले. दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत त्यांनी दिल्ली हादरवून सोडली. त्यांचे आंदोलन आटोक्यात आणण्याचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. या जमावाने हिंसक स्वरूप धारण करीत राष्ट्रपती भवनची सुरक्षा व्यवस्था भेदली. एका पोलीस कॉन्स्टेबल ला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.
भारतात सामाजिक विषमता हि जात, धर्म आणि लिंग या तीन घटकावर आधारित आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत आले आहे. स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपारिक, प्रतिगामी मानसिकता आहे. स्त्रियांना शिक्षण, सत्ता, संपत्तीचे सारे अधिकार नाकारण्यात आले होते. धार्मिक कायद्यांचा आधार घेवून स्त्रियांवर अधिकाधिक बंधने लादली गेली. सतीप्रथा, हुंडाप्रथा, बालविवाह यासारख्या अनेक अन्यायकारक चालीरीतिनी लाखो स्त्रियांचे अवघे आयुष्यच करपून टाकले. भारतात ब्रिटीशांचे आगमन होईपर्यंत या निर्दयी प्रथा चालूच होत्या. ब्रिटीशकाळात जोतीबा फुले आणि सावित्रीमाई, राजा राममोहन रोय यासारख्या भारतीय समाजसुधारकांची स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ आणि ब्रिटीशांचा स्त्री विषयक पाश्चात्य दृष्टीकोन यामुळे ब्रिटीशानी अनेक वाईट चालीरीती बंद करण्यासाठी कठोर कायदे केले. सतीप्रथा बंदी कायदा (१८२९), विधवा पुनर्विवाह कायदा (१८५६) संमतीवयाचा कायदा (१८८६) यासारख्या कायद्यांनी अनिष्ठ प्रथांना ब्रिटीशानी चाप लावला.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्त्रियांच्या हक्क अधिकारासाठी, त्यांच्यावरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी अनेक कायदे केले गेले. परंतु स्त्रियांच्या अत्याचाराचे वाढते प्रमाण रोखण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत.
गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणार्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे, ती पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणार्या तक्रारीवरून दिली आहे. परंतु नोंद होणार्या घटनांपेक्षाही अनेक कारणांमुळे अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या जास्त आहे. खालील आकडेवारीवरून एक नजर टाकली तर स्त्री अत्याचाराचे भीषण वास्तव दिसून येईल.
![]() |
Ref.: The Indian Express, 26th Dec. 2012. |
मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी लोकलमधून प्रवास करताना अवतीभवतीच्या चोरट्या नजरा, किळसवाने स्पर्श या सर्वांचा सामना अनेक स्त्रियांना रोज करावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी होणारी धक्काबुक्की, आणि त्यातून स्वत:चा स्वार्थ साधून घेणारे महाभाग हे दृश्य नेहमीच पहावयास मिळते. कॉलेजला येणा-जाणार्या मुलींची अनेक वेळा टारगट मुले छेड काढतात. घाणेरड्या कॉमेंट पास करणे, अश्लील हावभाव करणे यासारखे प्रकार सर्वसामान्य झाले आहेत. अनेक स्त्रियांना स्वतःच्या घरी मिळणारी अपमानास्पद वागणूक, त्यांची मानहानी, शारीरिक, मानसिक छळ यामुळे अनेक महिलांचे जीव जात आहेत. स्त्रियांवर होणार्या बलात्कारापैकी बहुतांशी बलात्कार हे नात्यातल्या किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून केलेले असतात, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. त्यामुळे अशा घटनांची जास्त वाच्यता होत नाहीत. परिणामी अशा तक्रारी पोलीस स्टेशन पर्यंत येत नाहीत. त्यामुळे स्त्रियांना/मुलीना मुकाटपणे छळ सहन करावा लागतो.
स्त्रियांवरील अन्याय/अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहेच, परंतु त्याबरोबरच आवश्य आहे ती जनजागृती. स्त्रियां/मुलींना मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे. आणि शाळा, कॉलेज, स्वयंसेवी संस्था यांनी प्रयत्न करून हे उपक्रम राबवले पाहिजेत. आजकाल प्रेमप्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता मुलगा आणि मुलगी या दोघांचेहि समुपदेशन करण्याची गरज आहे. प्रेम करणे हि वाईट गोष्ट नाही. परंतु प्रेमाच्या नावाखाली अश्लीलतेचा जो नंगानाच चालू असतो, तो फार भयंकर आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी यात फारच आघाडीवर आहेत. अनेक तरुणांची जी प्रेम प्रकरणेचालू आहेत, ते आपल्या जोडीदाराबरोबर निर्जन स्थळी जावून अश्लील चाळे करतात (अपवाद आहेत.) हे निश्चितच सामाजिक हिताचे लक्षण नाही. प्रेम हि उदात्त भावना बाजूलाच राहते आणि वासनेचा बाजार सुरु होतो. अशा घटनांमध्ये बहुतांशी वेळा मुलीच बळी ठरतात. लग्नाचे, नोकरीचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवायचे आणि आपली गरज पूर्ण झाली कि त्या मुलीला वार्यावर सोडायचे हे सर्रास घडते. काही घटनांची पोलीस स्टेशन ला नोंद होते मात्र बहुतांशी मुली बेअब्रूच्या भीतीने गप्पच राहतात. तक्रार करीत नाहीत. त्यामुळे ज्या घटना उजेडात येतात त्यापेक्षा वास्तव फारच भीषण असते.
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरातही अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. सायंकाळी सहा नंतर पार्वतीच्या टेकडीवर तरुण मुला-मुलींचे काय धंदे चालू असतात ते एकदा पहा, म्हणजे तरुण पिढीची कशी अवनती होत चालली आहे ते दिसून येईल. बर्र, अशा गोष्टीना पोलीस किंवा प्रशासन का चाप लावत नाही हा प्रश्नच आहे. त्या टेकडीवर सायंकाळी फिरायला येणाऱ्या सर्व लोकांना माहित आहे कि तिथे वाईट प्रकार रोजच घडतात. अनेक जोडपी तिथे अंधारात बसलेली असतात. त्यावेळी तिथून काही टारगट मुलेही फिरत असतात. यातून जर एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण ? अश्लील चाळे करणारे युवक-युवती ? कि पोलीस आणि प्रशासन ? कि उघड्या डोळ्यांनी तो प्रकार पाहणारा सारा समाज ?
अनुचित घटना घडल्यानंतर दोषींना शिक्षा देणे हे समाजिक सुव्यवस्थेचे लक्षण नाही तर अशा प्रकराना आळा घालणे हि सामाजिक सुव्यवस्था आहे. परंतु दुर्दैवाने आपण अशा घटना घडेपर्यंत गप्प राहतो. आणि घटना घडली कि प्रशासन किंवा इतर गोष्टींवर त्याचा राग काढतो. पण आपण स्वतः आपली जबाबदारी कितपत पार पाडतो हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा. कारण सामाजिक सुधारणा तर सर्वांनाच हवी असते मात्र ती स्वतःला वगळून.
प्रत्येकाने जर आपली आई, बहिण, बायको, मुलगी यांना सन्मानाने वागविले, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय/अत्याचार होणार नाही याकडे लक्ष दिले, वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले तर अशा घटनांमध्ये निश्चितच घट होईल. पुरुषांनी आपली पुरुषप्रधान मानसिकता बदलून स्त्रियांना समजून घ्यायला हवे. पुरुषांचा अहंगड आणि स्त्रियांचा न्यूनगंड कमी होण्यासाठ प्रयत्न करायला हवेत. समाजात घडणार्या अनुचित घटनांना त्या-त्या वेळी प्रत्यक्षदर्शीनी विरोध करायला हवा. पोलीसानीही अशा मदत करणाऱ्या लोकांशी सौजन्याने वागावे, जेणेकरून लोकांची मदत करण्याची भावना वाढीस लागेल.
मुलीनी स्वतःसाठी काही नियम लावून घेतले पाहिजेत. याचा अर्थ मुलीनी बंधनात राहावे असा अजिबात नाही. परंतु कोणत्याही मुलांशी मैत्री करताना त्याची पार्श्वभूमी, स्वभाव, त्याच्या सवयी या गोष्टींची माहिती घ्यावी. कुणीही आपला गैरफायदा घेणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. काही चुकीचा प्रकार वाटलाच तर क्षुल्लक समजून त्याकडे दुर्लक्ष करू नये. लगेच वडीलधार्या व्यक्तींच्या कानावर हा प्रकार घालावा. जेणेकरून वेळीच अशा घटनांना पायबंद घालता येईल. प्रेमाचे नाटक करून मुलींचा उपभोग घेण्याचे प्रमाण अलीकडे फार वाढले आहे, त्यामुळे मुलीनी सावध राहणे हेच योग्य. दुसर्या बाजूला मुलांनीही मुलींकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टीकोन बदलला पाहिजे. ज्या वयात शिक्षण, करिअर या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे त्या वयात प्रेमाच्या नावाखाली चुकीच्या मार्गाने जावू नये. मुलींची छेड काढणे, त्यांना त्रास देणे यासारखे प्रकार करू नयेत किंवा कोणी करत असेल तर पोलीस, शिक्षक, पालक वगैरे लोकांची मदत घ्यावी. स्त्रियांची सुरक्षा हि केवळ स्त्रियांची समस्या नाही तर ती पुरुषांचीही समस्या आहे हे प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवावे.
पुढील काळात कायद्यांची कडक अंमलबजावणी, सामाजिक जागृती, पोलीस-प्रशासनाचे प्रयत्न या सर्व माध्यमातून स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, तरच निकोप समाजाचे आपले स्वप्न साकार होईल.
No comments:
Post a Comment